28 November 2018

मुळशीचा पॅटर्न आहे खतरनाक




प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न हा मराठी चित्रपट नुकताच प्रसिद्ध झाला. काल मंगळवारी हा चित्रपट मी आवर्जून बघितला. या चित्रपटामध्ये पुणे जिल्ह्यातील मुळशी भागातील जमिनीचा होणारा भांडवलीलिलाव व त्यामधून झालेला भौतिक विकास, मुळशी भागातील राजकीय व सामाजिक जीवन, जमीन विकलेल्या शेतकर्‍यांचे आणि त्यांच्या पुढील युवा पिढीचे जीवन यांचे उत्तम, ओघवते, निखळ पण विचार करायला लावणारी वस्तुनिष्ठ मांडणी प्रेक्षकांच्या काळजाचा अचूक ठाव घेते. चित्रपट पाहताना असा एकही प्रेषक नसेल की त्याच्या डोळ्यात पाणी आले नसेल वा तो भावनिक झाला नसेल. चित्रपटास मनाला भिडतील असे संवेदनशील संवाद व निखळ मनोरंजनाची जोड मिळाली आहे. या चित्रपटाच्या माध्यमांधून दिग्दर्शक वास्तविक मांडणी करण्याबरोबर प्रेक्षकांना विविध गोष्टींवर विचार करायला भाग पडतो. विकासाच्या नावाने स्वीकारण्यात आलेली भांडवली व्यवस्था व तिला जगावण्यासाठी निर्माण करण्यात आलेले कायदे व सरकारी नियम शेतकरी वर्गास क्षणिक लोभात फसवतात. १९९१ नंतर भारतातील विविध शहरात विकासाचे शैक्षणिक, औद्योगिक व तांत्रिक मायाजाल निर्माण करण्यासाठी शेतकर्‍यांकडून त्यांच्या जमिनी घेण्यात आल्या. शेतकर्‍यांनी स्वप्नातही पाहिला नसेल इतका पैसा त्यांना शेतजमिनीसाठी देण्यात आला. परंतु हजारो शेतकरी आपली जमीन विकायला सहजासहजी तयार झाले असतील का?, जमिनी विकण्यासाठी शेतकरी का तयार झाला? हा महत्वाचा मुद्दा असून याचे धागेदोरे चित्रपटात दाखविले नाहीत. त्यामुळे त्या अनुषंगाने चित्रपटच्या निमित्ताने या प्रश्नांचा विचार होणे आवश्यक ठरते.
            १९९१ नंतर आपण मुक्त वा भांडवलशाही धोरणाच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. ही व्यवस्था फक्त नफा केंद्रीत वा भरपूर पैसा मिळवण्यासाठी निर्माण झालेली. त्यासाठी वाट्टेल त्या मार्गाचा स्वीकार करण्याची तिची तयारी. तिने फेकलेल्या जाळ्यात आमचा स्वावलंबी व जगाचा पोशिंदा शेतकरी सहज जाळ्यात अडकला. कारण शिक्षणाने माणूस शहाणा होतो आणि तो समाज्याच्या भल्यासाठी काम करतो, अशी त्याची प्रामाणिक धारणा. परंतु भांडवली व्यवस्था व तिचे स्वरूप समजून घेण्यास  शेतकरी अनभिज्ञ होता. एकतर शेतकर्‍यांच्या पिढ्यानुपिढ्या कोणालाच शिक्षणाचा गंध नाही आणि ज्याने शिक्षण घेतले, तो शहरात जाऊन नोकर बनला. शहरातच कायमचा स्थायिक झाला. त्यामुळे धावत्या जगाचे आकलन होण्याचे मार्ग त्याच्याकडे उपलब्ध नव्हते. काळाच्या पटलावर विकसीत होणार्‍या नव्या तंत्रज्ञानाने कांही मार्ग वा साधने उपलब्ध करुन दिली. यातील दूरदर्शन, चित्रपट व इतर माध्यमामधून या चकाकणार्‍या भौतिक व तांत्रिक जगाचे दर्शन त्यास झाले. परंतु या माध्यमातून शेतकरीकष्टकरी वर्गास  'शाररिक काम' करणे कसे निकृष्ट व कमी प्रतीचे आहे, हेच दाखवण्यात आले. कामाला प्रतिष्ठा नाही आणि आरामात जगायचे असेल तर पैसाच महत्वाचा आहे, याची मांडणी करण्यात भांडवली व्यवस्था यशस्वी झाली. या भांडवली व्यवस्थेत शिरकाव करण्यासाठी उच्च शिक्षण व त्यासाठी पैसा गरजेचा झाला. पण शेतीमधून मिळणारा पैसा अत्यल्प असल्याने त्या सर्व स्वप्नाळू व ऐशोरामाच्या गरजा त्यामधून पूर्ण होत नसे. देशात असणारे शेती विषयक धोरणे, कायदे व सरकारी नियम यामुळे शेतकरी वर्ग या भांडवली व्यवस्थेत तग धरू शकेल अशी परिस्थिती नव्हती व ती आजही नाही. शिवाय राजकीय पक्ष, सरकारी अधिकारी, व्यापारी-उद्योजक व भांडवलदार यांची स्वार्थी यंत्रणा ओळखण्यात शतकरी त्यावेळी सक्षम नव्हता. विकासाच्या जोडीला निर्माण होणारे नवे उद्योग, औद्योकीकरण व शिक्षणाचे व्यापारीकरण शेतकर्‍यांच्या आकर्षणाचे नवे आयाम बनले. परंतु देशात भांडवली व्यवस्था उभी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन हवी होती. ती जमीन शेतकर्‍यांच्या नावाने असल्यामुळे ती काढून घेण्यासाठी भांडवली व्यवस्थेला सहज शक्य होते. कारण शेती उत्पादनास कोणत्याही हमी भावाची शाश्वती नाही आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारा अपुरा पैसा या दोन मोठ्या संकटात शेतकरी अडकला होता. भांडवली व्यवस्थेने आपला विस्तार करण्यासाठी स्थानिक व्यक्ति, अधिकारी वा राजकीय नेते यांना मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला. याचा परिणाम असा झाला की, स्थानिक नेते व अधिकारी यांच्या शब्दांवर विश्वास ठेवत शेतकर्‍यांनी आपल्या कांही वा पूर्ण जमिनी विकल्या. जे कोणी शेतकरी जमिनी देण्यास तयार नव्हते, अशा शेतकर्‍यांना धमकावून, छळ करून  वा पैसाचे आमिष देऊन त्यांना बेकायदेशीर प्रवृत केले. ज्यांना जमिनी विकून पैसा मिळाला होता; असे शेतकरी मोठ्या आरामात आपले जीवन जगत होते. त्यांच्या या रहणिमानाची भुरळ अन्य शेतकर्‍यांवर पडणे साहजिकच होते. परंतु मिळालेला पैसा कोठे गुंतवायचा व कसा खर्च करावा याचे कसलेही ज्ञान त्यांच्याकडे नव्हते. कारण त्यांच्या पिढीत कोणालाच शिक्षणाचा गंध नाही. याच वर्गातील शिकलेल्या व्यक्तीना समाजात किंमत नव्हती. शेवटी उपलब्ध असणारी आपली जमिनी विकून आरामात जीवन जगण्यास भाग पडणारी व्यवस्था उत्तोरोत्तर आपले पाय पसरू लागली. यातून शाररिक कष्टाची जी उपेक्षा झाली ती आजही कशीच कायम आहे.


जमिनी विकलेल्या शेतकर्‍यांचे जीवन पुढे सरकत होते पण त्यांना मिळणारा पैसा आटत चालला होता. शिवाय त्याच्या पुढील पिढीचे जीवन संकोचीत, गुलामी व आळशी बनले. रासायनिक व यांत्रिक  पीक पद्धतीच्या वाटेवर शेती कसून उपजीविका करणे अधिकच गंभीर झाले. शेतीत घेतले जाणारे पीक आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ कधीच बसला नाही वा सरकारने त्यासाठी कधीच प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. शिवाय विभक्त कुटुंब पद्धतीमुळे उपलब्ध जमिनीचे तुकडीकरण झाले. शेतीच्या लहान-लहान आकरमानामुळे शेती सततच तोट्यात असे. शेतकर्‍याच्या घामाला कोठेच किंमत नसल्यामुळे त्याला आपल्याच जिवानाची लाज वाटायला लागली. शेतीवर आपली उपजीविका करण्यासाठी असणारा आत्मविश्वास नाहीसा झाला. व्यवस्थेच्या शोषणामुळे तो भांडवली व्यवस्थेच्या दावणीला नव्या मार्गाने  बांधला गेले. या व्यवस्थेने उपजीविकेचे मोडके तोडके साधन देऊन त्यांना आपली जमीन विकण्यास भाग पाडले वा कधी जीवे मारण्याची धमकी देऊन ती ताब्यात घेतली.  शेतकरी वर्गाच्या पुढील पिढीवरील संकट अधिकच गडद झाले. ना पैशाच्या शाश्वती ना उपजीविकेचे कोणतेही साधन यामुळे तो गुलामी व्यवस्थेत कायमच वळचणीस बांधला गेला. त्याची पुढील पिढी उपजीवेकेसाठी वाट्टेल त्या मार्गाचा स्वीकार करण्यास बळी पडली. यातून निर्माण होणारे गुन्हेगारीचे चित्रण 'मुळशी पॅटर्न' चित्रपटात नेमकेपणाने केले आहे.
भांडवलशाहीत विकास सर्वांसाठी असला तरी एकाचा विकास दुसऱ्याच्या विनाशावर उभा राहतो आणि समाजात विनाशाचीच बीजे पेरली जातात. विकास आपल्या आजूबाजूने उभा राहात असताना त्याच्या मागे दडलेल्या वा दडवलेल्या अनेक घटनांची झळ आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोवर आपण निश्चिंत राहतो. मात्र आपण डोळे बंद केले म्हणून घडणारे बरेवाईट परिणाम थांबत नाहीत. ते घडलेले असतात आणि एका क्षणाला भय वाढवणाऱ्या या घटनांचे एक दुष्टचक्र निर्माण झाले आहे हेही आपल्या लक्षात येते. सिनेमातला राहुल हा शेतकर्‍याचा तरुण पोर. त्याच्या बापाच्या अविचारी वर्तनाने गेलेली जमीन, त्यातून होणारा अन्याय आणि नैराश्य यातून राहुल व त्याच्या पिढीने स्वीकारलेला मार्ग यावर हा मुळशी पॅटर्न बनला आहे. उपजीविकेचे शाश्वत साधन शेती व ती नसल्यावर निर्माण होणारे सामाजिक-आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक-कायदेशीर प्रश्न समजून घेण्यासाठी मुळशीचा खतरनाक पॅटर्न अवश्य पहा.

कलाकार: ओम भूतकर, मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, क्षितिज दाते, सुरेश विश्वकर्मा, मालविका गायकवाड, सविता मालपेकर.