30 January 2018

स्वार्थी-लाचारीचा 'स्वा-भिमान'



खूप दिवसापासून मनात घोंगावत असलेले वादळ आणि वादळातून निर्माण झालेला सामाजिक आणि आर्थिक प्रथा-परंपरेविषयाचा क्रोध, मनातिल चीड आपल्यासमोर तटस्थ पणाने मांडत आहे. या सामाजिक प्रथा, परंपरा वा रूढी याबद्दलची सर्वस्वी माहिती मला 'घागरे' नावच्या कुटुंबातून म्हणजेच माझ्या घरातूनच झाली. जस-जसे माझे सामाजिक भान असणारे मन व वय वाढत गेले तस-तसे या सामाजिक व त्यातून निर्माण होणार्‍या आर्थिक समस्येची गांभीर्याने ओळख झाली. शिवाय त्या सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा यातून निर्माण झालेल्या आर्थिक प्रश्नांच्या झळाही प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत. एकप्रकारे जीवघेण्या प्रथा व परंपरा याबद्दल मी आज माझे मन मोकळे करणार आहे. कदाचित हा प्रकार व प्रथा समाजातील प्रत्येक जाती-धर्मात प्राकर्षाने  दिसून येते. हीच प्रथा शेकडो वर्षापासून वेगळ्या स्वरुपात होती आणि ती मागील काही दशकापासून आधुनिक स्वरुपात चालू असलेली दिसून येते. आजच्या दिवसात जे कांही घडले त्यातून या संतापात अधिकच वाढ झाली. या प्रथा व परंपरेचा स्वीकार आजच्या काळातील तरुण पिढी की जिच्या तोंडी फक्त छत्रपती शिवाजी महाराजापासून ते थोर समाजसुधारकांचे नाव आहे; पण त्यांचे आचरण, वर्तन  हे प्रतिगामी, अविवेकी किंबहूना स्वार्थीपनाचे असल्याचा खात्रीशीर भास होतो.  मी बोलत आहे माझ्याच जाती-धर्मातील 'लग्न आणि त्यानंतरच्या प्रथांबद्दल'....
            महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये (सर्वच जाती-धर्मात) लग्नकार्य म्हणजे एक शुभकार्य मानले जाते. त्यामुळे लग्नकार्य हा सोहळाच असतो. दोन जीवांचा वा दोन व्यक्तिमत्वांच्या सहजीवनाचा सुरेख धागा विणण्याचे कार्य यातून घडूत असते. सामाजिक बांधणी आणि सामाजिक जबाबदारी यांचा संयोग करणारा भाग म्हणूनही लग्नकार्याकडे पाहता येईल. त्यामुळे त्यास सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. पण या सामाजिक प्रतिष्ठामध्ये लाचारीच्या स्वार्थीपनाचा शिरकाव केला आणि ती एक अनिष्ट, जीवघेणी प्रथा म्हणून ओळखली जाऊ लागली. ही अनिष्ट वा जीवघेणी प्रथेचा नायनाट करण्याचे सोडून ती अधिक भक्कम करण्याचे आचरण मराठा समाजातील तरुण वा नागरिक की जे सरकारी उच्च पदावर विराजमान झालेले, व्यावसायिक ऊंची गाठलेले वा इतर क्षेत्रात स्थिर-स्थावर झालेले आहेत त्यांचाकडून होत आहे. याशिवाय समाजास उपदेश करताना यांच्याच तोंडी मोठ-मोठया महापुरुषांची व समाज सुधारकांची नावे असतात. पण कृती मात्र एक स्वाभिमान वा कार्यकर्तुत्व हरवलेल्या प्रतिगामी व्यक्तीप्रमाणे. म्हणून मला या दोन कृतींमधील फरकाची चीड येते. एखाद्या वेळेस अज्ञानी व्यक्तींची मी बौद्धिक कुवत समजू शकतो पण उच्च विभूषितपणाचे मुकुट घालून समाजात प्रौढी मिरवणार्‍या व देशाचे भवितव्य असणार्‍या तरुणांच्या बौद्धिक पातळीची कीव येते की फक्त आर्थिक फायद्यासाठी या अनिष्ट प्रथांचे संगोपन करतात. या प्रथा खालील मुद्यातून पदोपदी दिसून येतात.
1. पहिल्या क्रमांकाची प्रथा म्हणजे लग्नात घेतला जाणारा हुंडा होय. स्वत:च्या पायावर उभा राहणारा तरुणही या हुंडा प्रथेचा नायनाट करण्यासाठी का धजावत नसेल, याचे आश्चर्य वाटते. मान खाली घालून लाचार व्यक्तीप्रमाणे स्वत:चा लिलावच स्वत:च करून घेतो. याशिवाय अंतरवस्त्रापासून ते पायातील बुटजोडे घेण्याचा सर्व खर्च मुलीच्या बापाकडून घेतो (हीच गोष्ट कांही अंशी मुलींनाही लागू पडते). किती ही खालच्या पातळीची लाचारी म्हणावे लागेल.
2. दुसरी प्रथा ही वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता पडल्यानंतर दिसून येते. जेंव्हा वधू-वर थोरांचे आशीर्वाद घेतात तेंव्हा या लाचार तरुणांना (लग्न केल्याचा पराक्रम म्हणूनही म्हणता येईल) एक सोन्याची अंगठी हवी असते.
3. तिसरी प्रथा म्हणजे लग्न झाल्यानंतर या लाचार तरुणाचे त्याच्या सासरी 'नंव-जुन' करण्याचा कार्यक्रम. या कार्यक्रमात त्या लाचार तरुणालाही संपूर्ण कपड्यांबरोबर एक सोन्याची अंगठी हवी असते.
4. चौथी प्रथा म्हणजे मुलीच्या 'डोहाळे-जेवणाचा' कार्यक्रम. या कार्यक्रमाठी लाचार तरुणांना एक सोन्याची अंगठी हवी असते. (बाप होण्याच्या काही महिन्याआदोगर)
5. पाचवी प्रथा म्हणजे या लाचार तरुणाच्या मेव्हण्याच्या /मेव्हणीच्या लग्नकार्यातील. या लाचार तरुणांना जावायाचे मानापमान म्हणून एक सोन्याची अंगठी तेही संपूर्ण कपड्यांबरोबर हवी असते.
            या वरील अनिष्ट प्रथा-परंपरांमध्ये सोने-दागिने वा आर्थिक व्यवहार या संबंधीचा घेवाण-देवाणीचा बाजार तरुण स्वःहून मागत नसेलही; परंतु स्वाभिमान नाहीसा करून व मान खाली घालून त्याचा मुकाट्याने ज्यावेळेस तो स्वीकारतो त्यावेळेस त्यांनाही या सर्व गोष्टी हव्या होत्या, असाच त्याचा 100 टक्के अर्थ होतो. जरी मुलीचा बाप स्वत:हून हे सर्व आर्थिक व्यवहार करीत असला तरीही आपल्या मुलीला सासरी कोणताही जाच वा छळ होऊ नये, एवढीच त्याची अपेक्षा असते.मुलीचा बाप कांही स्वखुशीने हे मानापमानाचे कार्यक्रम कधीच करीत नाही. परंतु त्यास प्रवृत्त करते ती आजच्या तरुणांनी स्वीकारलेली स्वार्थीपणाची 'लाचारी'.
            संपूर्ण जगाचा अभिमान व महाराष्ट्राचा गौरवशाही इतिहास घडविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात मुलीच्या लग्नासाठी पैसा नाही म्हणून अनेक पित्यांनी मृत्यू स्वीकारला तर कांही मुलींनी आत्महत्या केली. त्याच राज्यातला मराठा तरुण स्वाभिमान गहाण ठेवणार्‍या व मराठी अस्मितेवर वार करणार्‍या प्रथा-परंपरां संगोपन करतो, याचे अतिम दु:ख व त्रास होतो. आजच्या लाचार तरुणांच्या तोंडी छत्रपती शिवरायांचे नाव आणि आचरण एखाद्या लाचार गुलामाप्रमाणे. गरज आहे ती फक्त कधीही न मोडणारा स्वाभिमान व मराठी अस्मिता जागृत ठेवण्याची आणि ती कृतीत उतरवण्याची. यासारख्या अनिष्ट, पिळवणूक व स्वाभिमान हिरावून घेणार्‍या प्रथा-परंपरा नष्ट केल्या तरच आपण खर्‍या अर्थाने 'छत्रपती शिवरायांचे मावळे' होण्याच्या लायकीचे होऊ.

            अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांचे वाक्य आवर्जून आठवते ते म्हणजे, जेंव्हा एखाद्या वस्तीत आग लागते, तेंव्हा कोणताही मनुष्य दुसर्‍यांच्या घराएवजी आपले घर व घरातील व्यक्ती यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच प्रकारे या अनिष्ट प्रथा-परंपरा यापासून स्वत:च्या घराला वाचवण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सदैव चालू राहतील. परंतू यातून माझे नातेवाईक वा माझे भारतीय यांचे मन न दुखवणार त्यांचे मन परिवर्तन करण्याचा ध्यास अखंडपणे सुरू राहील. 

1 comment: