20 February 2017

मुंबईचा 'लोकल अर्थ'


मुंबई, कधी काळचे बॉम्बे. प्रत्येकाच्या मनात एक वेगळेच स्थान  निर्माण करून ठेवलेले शहर. मुंबई आपल्या महाराष्ट्रची व देशाची आर्थिक राजधानी. त्यामुळे तिचा रुबाब काही वेगळाच. गजबजलेल्या या शहराने प्रत्येकाला काही तरी देण्याचा प्रयत्न केला तर काहींनी आपल्यास जे काही हवे आहे ते मुंबईकडून घेण्याचा प्रयत्न केला. येथील प्रत्येक घटना मनाला काही वेगळाच अनुभव देणारी असते. त्यामुळे प्रत्येकाला मुंबई अनुभवण्याचा मोह असतो. तो कधी घडवून आणावा लागतो तर काही तो आपोआप घडून येते. माझ्याही बाबतीत तो आपोआप घडून आला. निमित्त होते ते मुंबईतील एका नामवंत महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेस हजर राहण्यासाठीचे. परीक्षेपेक्षा जास्त ओढ होती ती आजपर्यंत जे काही वाचण्यात, ऐकण्यात व बघण्यात आलेल्या मुंबापुरीस जवळून बघण्याची, अनुभवायची. एका भेटीने मला काही सर्वच ज्ञात होईल अशातला भाग नव्हता. पण तरीही स्वत:च्या नेत्राने मुंबईचे दर्शन घेणे कमालीचे वाटत होते.
            कोल्हापूर-मुंबई असा प्रवास मी महालक्ष्मी एक्सप्रेस नावाच्या रेल्वे गाडीने केला. मुंबईत पहिले पाऊल ठेवले ते गजबजलेल्या दादर रेल्वे स्टेशनवर. वेळ अर्थातच सकाळी साडेसातची. प्लॅटफॉर्मवर चहा-नाष्टा विक्रेत्यांची सेवा हजर होती. परंतु मुंबईत प्रथमत: पाऊल ठेवणार्‍या प्रत्येक सदगृहसतास ज्याप्रकारे इच्छित स्थळी पोहचण्याची काळजी असते तशीच मला महाविद्यालयात वेळेवर पोहचण्याची काळजी होती. मग काय, मुंबईची रक्तवाहिनी व सर्वसामान्याची जीव की प्राण असणारी "मुंबई लोकल" पकडली. तिकीट फक्त पाच रुपये. त्यामुळे सर्वसामान्यांच्या संसारास हातभार लावणार्‍या 'तोंडात कमळाचे फूल घेऊन डरकाळी फोडणार्‍या वाघा'पेक्षा लोकलच अधिक सरस वाटली. साधारणत: सकाळी साडेआठ वाजता महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो. मराठीचा चमचा तोंडात घेऊन जन्मणार्‍या सुरक्षारक्षकाने "आपको ठीक नो बजे अंदर छोडा जाएगा" असे संगितले. मग काय काहीतरी पोटासाठी काहीतरी खावे, म्हणून ठेऊन बाहेर पडलो ते थेट मुंबईच्या लोकल अर्थ'करणातच पोहोचला. त्या वेळेपासून मी माझ्या विचारसरणीत गुंतत गेलो ते कोल्हापूरला परत आलो तेव्हाच जागा झालो. कारण मी मुंबईचा अर्थ'कारणाचा अर्थ शोधत होतो.
            महाविद्यालयानजीक असणार्‍या व मराठी पाटी असलेल्या एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्याकरिता गेलो. मेनू कार्ड पाहताच सामान्य माणसांना पडणारा प्रश्न तो ही मला पडला होता. अरेच्या "एवढे महाग". मग काय, पोटातील कावळे शांत होतील असा सर्वात स्वस्त असणारा पदार्थ शोधून काढला तो म्हणजे "इडली-सांभर". किंमत फक्त 40 रुपये. आमच्या कोल्हापूरला तीनवेळा नाष्टा करून झाला असता तेवढ्या पैशात. परीक्षा संपल्यानंतर साधारणत: दुपारी दोनच्या सुमारास मी महाविद्यालयातून बाहेर पडलो. खर्‍या अर्थाने मुंबईचे दर्शन सुरू होण्यास तेथून सुरवात झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूस खाद्यपदार्थांचे स्टॉल लागलेले दिसून आले आणि त्यावरती महाविद्यालयीन तरुण मुले-मुली विविध पदार्थांचे बिनधास्त अस्वाद घेत होते. खरेतर तेथील स्वच्छता व पदार्थाची गुणवत्ता हा एक संशोधनाचाच विषय ठरला असता. 
        दादरला परत जाण्यासाठी जेव्हा रेल्वे स्टेशनवर पोहोचलो, त्यावेळेस असे वाटले की, सकाळची गर्दी ही एक ब्ल्यु प्रिंट होती; पिच्चर/सिनेमा तर मी आत्ता पाहत होतो तेही हाऊसफूलचा फलक लागल्यानंतर आणि एका पायावर उभा राहून. कारण मुंबईच्या मराठी व इतर भाषिक भारतीयातील सर्वसामान्य माणसांना "रोडवरची बाल्कनी" कधीच परवडणारी नव्हती. खरे तर ती काही कामाचीही नाही. कारण लोकलच्या थिएटर मधून पुढे जाणार चित्रपट रोडवरील बाल्कनीतून कधीच पुढे जाणार नाही. लोकल मधील सरास व्यक्ती या टी-शर्ट परिधान केलेल्या होत्या. कारण लोकलमधून कितीही जपून प्रवास केला तरी कडक इस्त्री केलेला कोणताही शर्ट हा चुरघालणारच. त्यामुळे मुंबईत टी-शर्ट ग्राहक व विक्रेत्यांची झुंबड उडालेली असते. तमाशा कलाविष्काराठी फेटे कमी वरती फेकले जातील तेवढे टी-शर्ट वरती फेकून विक्री करणारे विक्रेते पाहावयास मिळतील. असो, मुंबईत प्रत्येकाच्या कानात हेडफोन हा एक अलिखित नियमच बनला आहे. कारण गर्दीत हेडफोन शिवाय फोनवर बोलणे म्हणजे विधानसभेचे तिकीट मिळविण्यासारखेच पराक्रमी कर्तुत्व. त्यामुळे प्रत्येक स्टेशनवर मेड इन चायना  उपक्रमांतिल हेड-फोन, स्क्रीन गार्ड, बॅक कव्हर यांचा सुळसुळाट होता. त्या जोडीला पाण्याची बाटली, पर्स, बेल्ट, नामांकित डुप्लीकेट कंपनीची मनगटी घड्याळे, लहान मुलांची खेळणी, नेलपेंट, लिपस्टिक, एक्स्पइरी डेट संपलेली सुगंधी बॉडी स्प्रे या व यासारख्या असंख्य वस्तु टोळीमाफिया प्रमाणे अनधिकृत जागेवर अतिक्रम करून स्थानापन्न झालेल्या होत्या.
            लोकलमधून प्रवास करणारा प्रत्येक माणूस हा ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करण्याची क्षमता असणारा असतो. कारण लोकण थांबण्याच्या आत तो फ्लॅटफॉर्मवरून धावत असतो. (सरकारने एखाद्या होतकरू लोकल प्रवाशास ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेण्याची एखादी संधी देऊन पहावे). लोकलने प्रवास करणार्‍याचा जीवनसाथी म्हणजे त्याच्या शरीरातून बाहेर पडणारा घाम. घामाने ओलेचिंब झालेले शरीर हा अनेकांना लाभदायीच ठरणारे असते. कारण त्याची सर्व वेळी सवय झालेली असते. असो, अशा  घामाने चिंब झालेल्या शरीरास ताजे-तवाने करण्यासाठी साबणाबरोबरच ( आंघोलीचा व कपड्यांचा ) तोंडाने चघळणारी चेंगम सर्वत्र उपलब्ध होतात. त्यामुळे मुंबईकरांना इतरांपेक्षा जास्त पाण्याची आवश्यकता असते.
            मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशनवर जीवनावश्यक समजला जाणारा पालेभाज्या विक्रीस ऑन ड्यूटि 24 तास प्रमाणे हजर असतो. काही तांत्रिक कारणामुळे लोकलला उशीर होणार असेल तर अशा विक्रेत्यांसाठी तो दिवाळीचाच सण. कारण ग्राहकांना धावत-पळतच सर्व साहित्य खरेदी करावे लागते. किमतीशी भांडण घाणल्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. कारण काही करून येणारी लोकल पकडायची असते. सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई ज्या पदार्थावर मुंबईकरआपले उदरनिर्वाह व पोटाची खळगी भरते, तो म्हणजे मुंबईचा वडा-पाव. विविध नावाने तो प्रसिद्ध आहे. दादारच्या रेल्वे स्टेशनवर असणार्‍या वडा-पाव सेंटरवर गेलो. जरा लांबूनच तेथे एक खांब असल्याचे जाणवले. परंतु जवळ जाऊन पाहतो तर तो एक कचरा-खांब होता. म्हणजेच डस्टबिन होता. कारण त्या वडा-पाव सेंटरमधून खवय्याची संख्याच इतकी होती की तो साधारणत: एका-दोन तासाने पूर्ण भरून जाई. त्यावरूनच मुंबईच्यावडा-पावचे अर्थकारण समजून जाईल. कदाचित भविष्यामध्ये मुंबईचे राजकारण व मुंबईतील पहिले महायुद्ध हे पाण्यापेक्षा वडा-पाव वरून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
            कोल्हापूरला निघण्यापूर्वी कांही क्षण असे जाणवले की, मुंबई ही खर्‍या अर्थाने मुंबापुरी आहे. कारण येथे कोणाला पैसा कामवायचा आहे, कोणाला नाव कामवायचे आहे तर कोणाला स्वत:चे घर घेऊन स्थायिक होण्याचे आहे. परंतू मुंबईच्या लोकल जीवण्याच्या धावपळीत माणूस माणसापासून दूर तर जात नाही ना, याबद्दल शाशंकता निर्माण होते. कारण मुंबईतील माणूस आरोग्यापासून, शाश्वत जीवण्याच्या अधिकारापासून व काही अर्थी माणुसकीपासून दूर जात असल्याच भास झाला. या प्रत्येक घटना सर्वांना माहीत आहेत. तरीही प्रत्येकजण त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण मुंबई ही हृदयाच्या ठोक्यापेक्षा, मानवी मूल्यापेक्षा, वेवेकापेक्षा भ्रमणध्वनीतील डिजिटल क्लॉकवर वा मनगटी घड्याळावर चालते...